Udhayanidhi Stalin – तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलीन यांना राज्याचे उपमुख्यमंत्री केले जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र या सगळ्या अफवा असल्याचे नमूद करत खुद्द स्टॅलीन यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. २१ जानेवारी रोजी सेलम येथे द्रमुकच्या युवा शाखेचे संमेलन होत आहे.
ते उदयनिधी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. त्याला विरोध करणाऱ्यांकडूनच ही अफवा पसरवली गेली असल्याचे स्टॅलीन यांनी म्हटले आहे. पोंगल निमित्त राज्यातील जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात आपल्या आरोग्यविषयी केल्या जात असलेल्या चर्चांनाही स्टॅलीन यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
तसेच राज्यातील जनता आनंदीत असेल तर मला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही असेही त्यांनी नमूद केले. माझे आरोग्य चांगले असून मी काम करतो आहे. केवळ खळबळ निर्माण करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत.
उदयनिधी यांना उपमुख्यमंत्री पद दिले जात असल्याच्या बातम्या निराधार आहेत. स्वत: उदयनिधी यांनीही याचा खुलासा केला असून मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा असल्याचे त्यांनीही म्हटले आहे.