बंगळुरू – माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत केवळ प्रचार करण्याची घोषणा केली आहे. वयाच्या कारणामुळे स्वत: निवडणूक रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी आता ९० वर्षांचा आहे. त्यामुळे उमेदवार बनून निवडणूक लढवणार नाही.
मात्र, गरज असेल तिथे प्रचाराला जाईन, असे देवेगौडा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत नमूद केले. पुत्र एच.डी.कुमारस्वामी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याविषयीचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले.
अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेप्रमाणे होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जेडीएसने कर्नाटकात आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपशी युती केली आहे. जेडीएस काही महिन्यांपूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीत (एनडीए) सहभागी झाला.
कर्नाटकात मागील वर्षी मेमध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये बाजी मारून कॉंग्रेसने त्या राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर भाजप आणि जेडीएस एकत्र येण्याची घडामोड घडली.