मुंबई – महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे ‘ईडी’च्या चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यातच आता ईडीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांकडे मोर्चा वळवला असून उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याची संपत्ती जप्त केली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई केली आहे. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे.
या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आहेत.
ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे.