ठाणे – रोशनी शिंदे मारहाण प्रकरणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मारहाणीनंतर उद्धव यांच्यासह रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी रोशनी शिंदे यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात फेसबूकवर पोस्ट केली म्हणून रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.
या घटनेचे ठाण्यात राजकीय पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना, राज्याला फडतूस गृहमंत्री लाभल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत फेसबूक पोस्ट केल्यानंर ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील आपल्या कार्यालयातून संध्याकाळी परतत असताना रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोशनी शिंदे यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा राजन विचारे यांनी केला आहे. रोशनी शिंदे यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती. रोशनी शिंदे मारहाणप्रकरणामुळे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याची माहिती आहे. तसेच याप्रकरणी एकनाथ शिंदेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली आहे.