पिंपरी, दि. 4 – शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी तिघांना मंगळवारी (दि. 4) पहाटे अटक केली. त्यामुळे गोपाळे खून प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे.
विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय 25), संदीप उर्फ आण्णा छगन गोपाळे (वय 31), ऋतिक शिवाजी गोपाळे (वय 22, तिघेही रा. शिरगाव, ता. मावळ ), महेश पोपट भेगडे (वय 41, रा. तळेगाव दाभाडे), अशोक लक्ष्मण कांबळे (वय 53, रा. कांब्रे, ता. मावळ), मनेश देवराम ओव्हाळ (वय 42, रा. जांभूळ, ता. मावळ), अमोल आप्पासाहेब गोपाळे (वय 38, रा. सोमाटणे फाटा) अशी अटक केलेल्या सात आरोपींची नावे आहेत.
शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सरपंच प्रवीण गोपाळे (वय 47) शिरगाव येथील साई मंदिराच्या समोर कोयत्याने हल्ला करीत खून केला. याबाबत सरपंच प्रवीण गोपाळे यांचे बंधू रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी रवींद्र यांनी काही स्थानिक व्यक्तींवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी रविवारी (दि. 2) चौघांना अटक केली. त्यांना गुरुवारपर्यंत (दि. 6) पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 4) पहाटे शिरगाव पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मुख्य तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांनाही सोमवारपर्यंत (दि. 10) पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांचा खून केल्याचा संशय त्यांचे भाऊ फिर्यादी रवींद्र यांनी व्यक्त केला होता. मात्र अद्याप पोलीस तपासात नेमके कारण समोर आलेले नाही.