सातारा – किल्ले प्रतापगड येथे शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रमाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शिवप्रतापदिनासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार नाहीत हे आता स्पष्ट झालं आहे.
उदयनराजे आजच्या या कार्यक्रमाला किल्ले प्रतापगडावर उपस्थित राहावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरापर्यंत प्रयत्न केले असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, तरी देखील उदयनराजे भोसले आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे उदयनराजे नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी किल्ले प्रतापगडावरील कार्यक्रमांना न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, उदयनराजे यांच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले या देखील प्रतापगडावरील कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.
उदयनराजे भोसले भगत सिंह कोश्यारी यांच्या बद्दल नेमकं काय? म्हणाले…
पुण्यात पत्रकार परिषदेत उदयनराजे भोसले म्हणाले, “शाहू, फुले, नाना पाटील, बाबासाहेब असतील, यांचे स्फूर्ती स्थान महाराज होते आणि हे म्हणतात महाराजांचे विचार जुने झाले. मग आजपर्यंत कोणामुळे पुढे वाटचाल झाली असा सवाल देखील उदयनराजेंनी यावेळी विचारला.
मी कोष्यारी यांच्या विरोधात नाही पण अशा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. असच चालू राहिले तर विकृती होईल. शिवाजी महाराज कुठल्या पक्षाचे नव्हते. मी आज परिवाराचा सदस्य म्हणून बोलतो आहे पक्ष वगेरे नंतर बघू.
मी राष्ट्रपती आणि नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले. तसेच पुढच्या वाटचालीबाबत भाष्य करणार असल्याचे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले.