मुंबई – “अवतार 2: द वे ऑफ वॉटर’ या बहुचर्चित सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झालं असून, सध्या सगळीकडेच या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वीच या सिनेमाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये आश्चर्यकारक स्पेशल इफेक्ट्स, व्हीएफएक्स आणि बॅकग्राउंड स्कोअर पाहायला मिळत आहे. हे सर्व पाहणे हा भारतीय प्रेक्षकांसाठी पूर्णपणे नवीन अनुभव असू शकतो.
चित्रपटाबाबत निर्मात्यांच्या अपेक्षाही खूप जास्त आहेत, संपूर्ण फ्रेंचायझीचे भविष्य आता अवतार 2 वर अवलंबून असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, नुकतंच या बहुप्रतीक्षीत सिनेमा बद्दल एक मोठी माहिती समोर असून, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘FEUOK’या केरळच्या संस्थेने कॅमेरून यांचा ‘अवतार 2’ केरळमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि FEUOK याच्यात चित्रपटाच्या नफा वाटून घेण्याबाबत बोलणी फिस्कटली असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे प्रेक्षकांच्या मनात देखील कुठं तरी नाराजी निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.
दरम्यान, भारतीय बॉक्स ऑफिसवर “अवतार 2” रिलीज होण्यापूर्वीच भरपूर कमाई करत आहे. होय, भारतात चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आतापर्यंत, इंग्रजी 3D मध्ये 27,100 तिकिटे, 4DX मध्ये 2,900 आणि हिंदी 3D मध्ये 5,300 तिकिटे विकली गेली आहेत. ज्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे. ‘अवतार 2’ 16 डिसेंबरला सगळीकडे रिलीज होणार असून, पहिल्याच दिवशी हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.