सातारा – रायगडावर छत्रपती शिवाजीराजे यांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करून त्याच्या अध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले असतील असे जाहीर केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील उदयनराजे प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना त्यामुळे झळाळी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये शिवसृष्टी उभारण्यासाठी रायगडावर 50 कोटी रुपये निधी देणार असल्याचे सांगितले. तसेच प्रतापगड प्राधिकरण जाहीर करून या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली.
लंडनमधील भवानी तलवार आणि वाघनखे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मंत्री सुधीर मनगुंटीवार यांचा त्यासाठी संवाद सुरू असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा या प्रकरणांमध्ये मोठी भूमिका बजावत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिवराज्याभिषेक दिनाच्या या मुहूर्तावर खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे मोठी जबाबदारी आल्याने राजे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खासदार उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रातही जादुई व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे संबंध सर्वपरिचित असून एक लढवय्या नेता म्हणून त्यांची ख्यातकीर्त आहे. प्रतापगड प्राधिकरणाची जबाबदारी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी एक मोठी संधी असून जिल्ह्याच्या इतिहासाला झळाळी देण्याची एक नवी संधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे.
प्राधिकरणाद्वारे मिळणार गडांना झळाळी
केंद्रीय कार्यकारिणीच्या सातारा दौऱ्यात उदयनराजेंकडे मोठी जबाबदारी येणार असे संकेत देण्यात आले होते. त्यानुसार केंद्राच्या निर्देशाप्रमाणे उदयनराजेंना प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात किल्ले अजिंक्यतारासह एकूण 25 हून अधिक गड आहेत. या गडांना झळाळी देणे, ऐतिहासिक ठेव्यांचे संरक्षण करणे त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे अशा मोठ्या जबाबदाऱ्या प्राधिकरणाच्या माध्यमातून पार पाडल्या जातील.