मॉस्को – रशियात अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आज दुसऱ्या दिवशी नागरिकांनी मतदान केले. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे प्रमुख दावेदार आहेत. या निवडणुकीत विजयी झाल्यास पुतीन यांना अध्यक्ष म्हणून आणखीन ६ वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. आपल्या विरोधकांना संपवण्याचे गंभीर आरोप पुतीन यांच्यावर सध्या होत आहेत.
रशियातील प्रसार माध्यमांवर आणि तटस्थ निरीक्षक गटांवर मोठे दडपण आणले गेले आहे. पुतीन यांचे कट्टर टीकाकार ऍलेक्सी नवालनी यांचा आर्क्टिक्ट येथील तुरुंगात संशयास्पद स्थितीमध्ये फेब्रुवारीमध्ये मृत्यू झाला. गेल्या २५ वर्षांपासून अशाप्रकारे विरोधक संपवल्यामुळे निवडणुकीतही त्यांना आव्हान देणारा एकही ताकदवान उमेदवार रिंगणार शिल्लक राहिलेला नाही.
त्यांच्यासमोर ३ किरकोळ विरोधकांचे आव्हान आहे. हे विरोधी उमेदवार देखील मित्र पक्षांशी संबंधित असल्यामुळे ही लढत अगदी खेळीमेळीची असणार आहे. या तिन्ही विरोधी उमेदवारांनी पुतीन यांच्यावर किंवा युक्रेनवर आक्रमण करण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीका न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. या युद्धाचे तिसरे वर्ष सुरू झाले आहे.
युक्रेनला अमेरिकेची मदत मिळत असल्यामुळे हे युद्ध रशियासाठी महाग पडू लागले आहे. युद्धासाठीचा आतोनात खर्चाचा ताण रशियाच्या अर्थकारणावर पडतो आहे. पुतीन यांच्या धोरणांनवर नाराज असलेल्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन रशियातील विरोधकांनी केले आहे.
शुक्रवारी पहिल्या टप्प्यातले मतदान पार पडले होते. आज अखेरच्या टप्प्यात युक्रेनचा जो भाग रशियाने बळकावला आहे, तेथे मतदान होते आहे. देशभरातील मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त असूनही हिंसाचाराच्या डझनभर घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी हातबॉम्ब फेकले गेले आणि मतपेट्यांवर हिरवा रंग ओतला गेला.
रशियातील निवडणुका म्हणजे लोकशाहीची खिल्ली असल्याची टीका पाश्चात्य देशांनी केली आहे. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत पुतीन यांचा विजय निश्चित आहे. हा विजय गृहित धरून युरोपीय कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी पुतीन यांचे अभिनंदन करणारी पोस्ट केली आहे. विरोधक नाही. स्वातंत्र्य नाही, पर्याय नाही, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे.