नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करत भाजपात दाखल झालेले उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यासाठी भाजपचे राज्यसभेचे खासदार दिल्लीत आहेत. याच दरम्यान उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. नुकत्याच सातारा जिल्हा बॅंकेची निवडणूक पार पडली त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असे म्हटले जात आहे की, ही एक सदिच्छा भेट होती. नुकताच शरद पवारांचा वाढदिवस झाला आणि त्यावेळी शरद पवारांची भेट घेणे शक्य नाही झाले. त्यामुळे आता उदयनराजेंनी दिल्लीत पवारांची भेट घेतली. शरद पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून ही एक सदिच्छा भेटच होती असे उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.