सातारा – भ्रष्टाचाराच्या आरोपांना समोरासमोर येऊन उत्तर द्यावे, हे डायलॉग आता खासदार उदयनराजे भोसले यांनी बदलावेत. नवीन काही तरी बोलावे आणि सातारकरांसाठी काही तरी करून दाखवावे, असा प्रतिटोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.
सातारा नगरपालिकेने आकारलेल्या घरपट्टीच्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. उदयनराजे यांनी बिनबुडाच्या आरोपांकडे आम्ही लक्ष देत नाही, या शब्दांत शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर टीका केली होती आणि काय बोलायचे असेल तर समोर या, असेही आव्हान दिले होते. या आव्हानाला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रतिक्रियेद्वारे प्रतिटोला दिला आहे.
ते म्हणाले, “”उदयनराजे भोसले आणि आमचे निवासस्थान समोरासमोर आहे. त्यांना जर समोरासमोर येऊन बोलायचे असेल तर त्यांनी खुशाल यावे आणि बोलावे. समोरासमोर येण्याचे सारखेसारखे तेच डायलॉग त्यांनी मारू नयेत. सातारकरांसाठी काही तरी करावे. जर ते इडी चौकशी लावायला तयार आहेत तर त्यांनी त्याबाबतचे पत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना द्यावे. कारण ते राज्यसभेचे खासदार आहेत. ते वारंवार दिल्लीला जातात.
त्यामुळे अशा चौकशीची मागणी ते सहज करू शकतात. ज्या अर्थी ते ईडी चौकशीच्या संदर्भाने बोलतात आणि कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे याचा अर्थ पालिकेत भ्रष्टाचार झाला आहे हे त्यांना मान्य आहे. सातत्याने दुसऱ्याविषयी टीकेची झोड उठवायची हे बरे नाही.” उदयनराजे यांनी आता सातारकरांसाठी काही तरी करून वेगळे काही तरी डायलॉग बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.