बर्लिन – करोनाच्या साथीला रोखण्यासाठीचे निर्बंध आणि लसीकरणाला विरोध करणाऱ्यांवर जर्मनीत आज व्यापक छापासत्र करण्यात आले. निर्बंध आणि लसीकरणाच्या मोहिमेला होत असलेल्या विरोधाबाबत तपास म्हणून ही कारवाई करण्यात आली.
ड्रेस्डेनमधील पाच ठिकाणांवर आणि हेडेनाउ येथील एका ठिकाणी हे छापे घालण्यात आले. गंभीर हिंसाचार घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या लोकांच्या शोधासाठी ही शोधमोहिम राबवण्यात आली, असे पोलिसांनी ट्विटरवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एका गटातील काही व्यक्ती सॅक्सोनी प्रांताचे गव्हर्नर क्रेश्मर आणि राज्य सरकारमधील अन्य प्रमुख सदस्यांची हत्या करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती गेल्या आठवड्यात उघड झाली आहे. करोना निर्बंध आणि लसीकरणाला विरोध करणारयांकडून हा कट रचला जात होता. टेलिग्राम या मेसेजिंग ऍपवर यासंदर्भातील काही संदेशांची देवाणघेवाण झाली होती, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले होते. त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान हे छापे घालण्यात आले.
टेलिग्रामवरील ग्रुपमधील 103 जणांनी लसीकरण आणि करोना विषयीच्या धोरणाला नाकारण्याची भूमिका घेतली होती. या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना क्रेश्मर यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र आवश्यकता वाटल्यास सशस्त्र विरोध करण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लीपदेखील व्हायरल झाली होती.