पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एका मोठ्या व्यावसायिकाच्या घरी भेट झाल्याच्या वृत्ताने राजकरणात खळबळ उडाली आहे. या व्यावसायिकाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, तरी दोन्ही गटांमधील नेत्यांकडून याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली जात असली, तरी नकारही दिला जात नसल्याने राजकीय चर्चांना जोर आला आहे.
कोरेगाव पार्कमधील एका मोठ्या व्यावसायिकांच्या घरी ही बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतचे वृत्त माध्यमांमधून समोर येताच या व्यावसायिकाने शरद पवार घरी जेवायला आले होते. मात्र, अजित पवार आले नाहीत असे सांगत ही बैठक झाली नसल्याचा खुलासा केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी दुपारपासून पुण्यात आहेत. शनिवारी चांदणी चौकाचे उद्घाटन असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात येणार होते. त्यामुळे हा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवार हे मेट्रोने चांदणी चौकात आल्याने पुन्हा सर्किट हाऊस येथे गेले. त्यानंतर तेथून ते खासगी वाहनाने कोरेगाव पार्कमध्ये या व्यावसायिकाच्या घरी गेले. त्यापूर्वी पवार हे तिथे गेल्याची चर्चा होती.
दरम्यान, अजित पवार यांनी स्वत: दोन दिवसांपूर्वी लोहगाव विमानतळावर पवार यांची भेट घेतल्याचे माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. या भेटीत काय चर्चा झाली?, यामागे कारण काय होतं?, दोघांची खरंच काही चर्चा झाली का? याचा कोणताही तपशील समोर आला नसला, तरी या भेटीच्या चर्चेने मात्र राज्यात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.