नवी दिल्ली – सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले बोर्डच्या निर्मितीसाठीच्या विकास कार्यक्रमाला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.
सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले बोर्डच्या उत्पादन आणि संरेखन या क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक ठरेल असे अनुदान पॅकेज देऊन, इलेक्ट्रॉनिक निर्मिती क्षेत्रात नवे युग सुरु करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरु केला जाईल.
त्यामुळे धोरणात्मक महत्त्व आणि आर्थिक स्वावलंबित्व या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या क्षेत्रांमध्ये भारताला तंत्रज्ञानविषयक आघाडी घेण्याचा मार्ग सुकर होईल. या कार्यक्रमासाठी आगामी 5-6 वर्षात 76 हजार कोटी रुपयांच्या तरतूदीला केंद्रीय मंत्रिमंडलाने आज मंजूरी दिली आहे.
डिजिटल परिवर्तनाच्या पुढच्या पायरीवर जाण्यासाठी सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले हे आधुनिक इलेक्ट्रॉनिक क्षेत्राचे पायाचे दगड आहेत. सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले ही अत्यंत गुंतागुंतीची आणि तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्रे आहेत. यामध्ये प्रचंड भांडवली गुंतवणूक, मोठी जोखीम, दीर्घ प्रक्रिया आणि परतावा कालावधी आणि तंत्रज्ञानात वेगाने होणारे बदल आणि लक्षणीय प्रमाणात शाश्वत गुंतवणूक प्रक्रिया आहे. हा कार्यक्रम भांडवली पाठबळ आणि तंत्रज्ञानविषयक भागीदारी उपलब्ध करून देऊन सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले निर्मिती क्षेत्राला मोठी चालना देईल.
मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन, माहिती तंत्रज्ञान हार्डवेअरसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन, इलेक्ट्रॉनिक घटक आणि सेमी कंडक्टर निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना आणि सुधारित इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्लस्टर्स योजनेसाठी 55,392 कोटी रुपयांचे प्रोत्साहन पाठबळ मंजूर करण्यात आले आहे. पायाभूत उभारणी केंद्र म्हणून सेमी कंडक्टरसह इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी भारताला जागतिक केंद्र ओळख मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एकूण, 2,30,000 कोटी रुपये पाठबळ देण्याची वचनबद्धता दर्शवली आहे.
या नुर्णयामुळे देशात सेमी कंडक्टर आणि डिस्प्लेचे डिजाईन, निर्मिती, उत्पादन,पॅकिंग आणि टेस्टिंग देशांतर्गतच करणे शक्य होईल, असे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.