विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतल्यास वेगळा निकाल- उदयनराजे भोसले

आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण द्या

सोलापूर: ईव्हीएमला आपला विरोध कायम असून बॅलेट पेपरवर मतदानाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेतल्यास निकाल वेगळा दिसेल, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. ईव्हीएमवर उपस्थित होणा-या शंकावर कोणीही बोलत नाही. याबाबत बोलले तर थेट नोटीस बजाविली जाते. देशात व्यक्ति स्वातंत्रय आहे कि नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. उदयनराजे भोसले म्हणाले,प्रगत राष्ट्रात ईव्हीएमवर मतदान प्रक्रिया होऊन निवडणूक पार पडल्यानंतर संशयाचे वातावरण निर्माण होताच पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुकांना प्राधान्य देण्यात येत आहे. नुसते निवडून येणे महत्वाचे नाही. मी सुद्धा पराभव पचवला आहे. यंदा आपले मताधिक्‍य 2 लाखांनी घटले आहे. शिवाय ज्या ठिकाणी उमेदवाराला 100 टक्के विजयाची खात्री होती त्या ठिकाणीसुद्धा उमेदवार दोन-दोन लाखाच्या फरकाने पराभूत झाले याचा अर्थ नेमका काय समजायचा.

हा सर्व कारनामा ईव्हीएम मशीनचाच आहे, हे स्पष्ट होते. झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यामध्ये सुद्धा फरक होणे हा नेमका प्रकार न समजायला लोक वेडे नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. 21 व्या शतकाकडे वाटचाल करत आहे असा डांगोरा पिटण्यापेक्षा मूळ विषयावर लक्ष केंद्रित होणे गरजेचे असल्याचे मतही खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले.

आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून एकमेकांमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार सुरु आहे. सामाजिक सलोखा निर्माण होण्याऐवजी आरक्षणावरून जातीजातींमध्ये भांडणे लागत आहेत. त्यामुळे मराठा, मुस्लिम, धनगर आणि लिंगायत समाजाला जातीच्या निकषावर आरक्षण न देता आर्थिक निकषावर सरसकट आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली.


दुष्काळावर केवळ राजकारण
दुष्काळ हा नैसर्गिक आहे. त्याची कोणीसुद्धा हमी देऊ शकत नाही. शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा दुष्काळ होताच. परंतु त्यावेळी दुष्काळाचे नियोजन केले जायचे. आज मात्र केवळ राजकारण होताना दिसून येत आहे. राजकारण होत राहील, मात्र समस्यांवर उपाययोजना होणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती शक्‍य नाही. तसेच इन्कम, रिसर्च, मॅनेजमेंट आणि ऍग्रीकल्चर अर्थात इर्माची सांगड घातल्यास शेतकरी साधन होईल असे मतही खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)