नाशिकमध्ये मुत्थुट फायनान्सच्या सेंटरवर दरोडा; एक ठार तीन जखमी

नाशिक: येथील उंटवाडी येथील मुत्थुट फायनान्सच्या सेंटरवर सहा दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या धुडगूस घालत लूटमार करत गोळीबार केला. तसेच सेंटरमधील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणही केली. या गोळीबारात एक जण ठार झाला असून दोन कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी घातलेल्या धुडगुसामुळे नाशिकमध्ये खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळी सहा दरोडेखोर या सेंटरमध्ये घुसले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना बंदुक आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघांनी चेहरा झाकलेला होता. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी केली. यातील सज सॅम्युअल यांनी दरोडेखोरांना विरोध करताच त्यातील एकाने सॅम्युअल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर सेंटरच्या मॅनेजरवर बंदुक आणि कुऱ्हाडीने हल्ला करत बेदम मारहाण केली. या हल्ल्‌यात चंद्रशेखर देशपांडे आणि कैलास जैन हे कर्मचारी जखमी झाले, त्यांच्यावर नाशिकच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरोडेखोरांचा सेंटरमध्ये धुडगुस सुरू असताना सुरक्षा रक्षकांनी सायरन वाजविला. त्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार करत त्या ठिकाणाहून धूम ठोकली. या दरोड्यात दरोडेखोरांच्या हाती काहीच लागले नाही. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी कर्मचाऱ्यांची रुग्णालयात भेट घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.