जमैका – वेस्ट इंडीजमध्ये येत्या शुक्रवारपासून आयसीसीच्या 19 वर्षांखालील युवा विश्वकरंडक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेता मानले जात आहे. यापूर्वी चार वेळा विजेतेपद व दोन वेळा उपविजेतेपद मिळवलेला भारताचा युवा संघ यंदा हा करंडक मायदेशी आणणार का, याचीच उत्कंठा निर्माण झाली आहे.
वेस्ट इंडीजमध्ये प्रथमच 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन होत आहे. ही स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होत असून, अंतिम सामना 5 फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये 16 देशांचे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेत 48 सामने होणार आहेत. या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
भारताचा समावेश ब गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडासह करण्यात आला आहे. देशात करोनाचा धोका वाढल्यामुळे व लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे न्यूझीलंडचा संघ या स्पर्धेत खेळणार नसून त्यांच्या जागी स्कॉटलंडचा संघ खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडीजसह स्कॉटलंड ड गटात आहेत. भारतीय संघानेही स्पर्धा 2000, 2008, 2012 आणि 2018 साली जिंकली होती, तर 2016 आणि 2020 साली भारत उपविजेता ठरला होता.
– स्टार स्पोर्टस नेटवर्कवर थेट प्रक्षेपण
– सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर
– भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरी गाठली तरच सामना
– साखळी फेरीत लढत नाही
– दोन्ही संघांना आपाल्या गटात पहिला किंवा दुसरा क्रमांक मिळणे आवश्यक
भारताचा संघ – यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (अतिरिक्त यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानव प्रकाश, कौशल तांबे, आर. एस. हंगारेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गर्व सांगवान.