पिंपरी – वाहनावरील ताबा सुटून कंटेनरने दुचाकी व खासगी आराम बसला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे नाशिक रोडवर मोशी येथे घडली.
वाहिद साहिद खान (रा. फतेपूर, बिहार ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी कंटेनर चालकाचे नाव आहे. बाळू शंकर कोळेकर (वय 50, रा. मु. पो. धामणे, ता. खेड, जि. पुणे) यांनी शनिवारी (दि. 11) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.
फिर्यादी यांचा भाऊ काळुराम शंकर कोळेकर (वय 46, रा. सद्गुरूनगर, भोसरी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास मयत काळुराम कोळेकर हे आपल्या दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी समोरून आलेल्या कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कंटेनर सिग्नलला धडकून पलिकडच्या बाजूला गेला. त्यानंतर कंटेनरने मयत काळुराम यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर कंटेनरने खासगी आराम बसलाही धडक दिली.