मुंबई – शिवसेनेने पुढील वर्षी होणाऱ्या उत्तरप्रदेश आणि गोव्यातील विधानसभेच्या निवडणुकाही लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पक्षाचे संसदेतील नेते संजय राऊत यांनी आज दिली.
त्यांनी सांगितले की, उत्तरप्रदेशातील अनेक शेतकरी संघटनांनी शिवसेनाला तेथे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राऊत म्हणाले की, उत्तरप्रदेशात आम्ही शंभर जागा लढवणार असून 40 सदस्य असलेल्या गोवा विधानसभेत आम्ही किमान 20 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तरप्रदेशात आम्ही छोट्या राजकीय पक्षांशी आघाडी करू शकतो असेही ते म्हणाले. गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करता येईल काय, याची आम्ही चाचपणी करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
गोवा आणि उत्तरप्रदेश या राज्यात आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जाळे आहे आणि या राज्यात शिवसेना यापूर्वीपासून निवडणूक लढवत आली आहे. हार-जीत याचा विचार न करता पक्षाचे अस्तित्व निर्माण करण्यावर शिवसेनेचा भर आहे.