पुणे – मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी आणि त्यांना घेऊन फिरण्यासाठी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. मैत्रिणींना फिरवण्यासाठी दुचाकी चोरल्याने तपासात निष्पन्न झाले आहे.
सौरभ दत्तात्रय चोरगे (20, आंबेगाव पठार) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस गस्तीवर असताना एकजण चोरीची दुचाकी घेऊन शिवदर्शन परिसरातील वसंतराव बागुल उद्यान येथे थांबल्याची खबर पोलीस हवालदार कुंदन शिंदे व शिपाई सागर सुतकर यांना मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून चोरगे याला ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर गाडीबाबत चौकशी केली असता, त्याने शहरातील विविध भागातून पाच दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी दत्तवाडी आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आणले आहेत. चोरगे याच्या अनेक मैत्रिणी असून त्यांच्यावर छाप पाडण्यासाठी व त्यांना घेऊन फिरण्यासाठी तो दुचाकी चोरत होता.
पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजु जाधव, अंमलदार सागर सुतकर, अमित सुर्वे, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, शरद राऊत, विष्णु सुतार यांनी केली.
आरोपी चोरगे हा लक्ष्मीनगर येथील एका दुकानात काम करतो. लॉकडाऊनमध्ये त्याची नोकरी सुटली आहे. त्याने वर्षभरात पाच दुचाकी चोरल्या आहेत. त्याच्या सुखसागरनगर ते कात्रज परिसरात तब्बल पाच ते सहा मैत्रीणी आहेत. त्यांच्याशी असलेले व्हॉटसअप चॅटींगही पोलिसांना मिळाले आहे.