नगर – नगर, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातून लग्नकार्य समारंभातून दुचाकी चोरणारे सराईत गुन्हेगार तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या अकरा दुचाक्या ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण, (वय-22,ता. शेवगाव,), राजेंद्र नानासाहेब काकडे,( वय-27, रा. बेलगाव, नगर) यांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याचा साथीदार श्याम उर्फ अक्षय गवळी, (रा.दहिगांव, ता. शेवगाव,) हा आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याकडून 3 होंडा शाइन, तीन बजाज पल्सर, एक रॉयल इन्फिल्ड बुलेट, 2 स्प्लेंडर हिरो होंडा, एक हिरो डीलक्स, एक बजाज कॅलीवर, अशा एकून अकरा दुचाक्या ताब्यात घेतल्या आहेत.
नगर, पुणे, औरंगाबाद या ठिकाणाहून लग्न समारंभ कार्यालयातून विविध कंपनीच्या दुचाक्या चोरून ग्रामीण भागात कागदपत्रे नंतर देतो म्हणून कमी किमतीत या दुचाक्यांची विक्री करून अनेकांना फसवले आहे. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हरूण मुलांनी यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे, नंदकुमार सांगळे, दत्तात्रय जपे, अविनाश वाकचौरे, मंगेश खरमाळे, धिरज अभंग, राम सोनवणे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे राहुल गुंड, अभिजीत अरकल, ज्योती काळे यांच्या पथकाने संयुक्त कारवाई केली.
शहरातील नागरिकांनी दुचाकी-चारचाकी खरेदी करताना संपूर्ण कागदपत्रांची शहानिशा करून वाहने खरेदी करावेत. तसेच विना नंबर व संशयित वाहने मिळून आल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यात कळवावे.
संदीप मिटके पोलीस उपअधीक्षक