लोणी काळभोर – उरुळी कांचन (ता. हवेली) येथे वेडाच्या भरात राहत्या इमारतीवरुन पडल्यामुळे एका मुलीचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत प्रियांका गोविंद जंगम (वय 24, रा. एस.के.सेंटर, उरुळी कांचन, ता. हवेली) या मुलीचा मृत्यू झाला असून या संदर्भात तिचे वडील गोविंद मल्लिकार्जून जंगम (वय 52) यांनी फिर्याद दाखल केली आहे. गोविंद जंगम यांचे उरुळी कांचन मध्ये आश्रम रोडवर बेन्टेक्स ज्वेलरीचे दुकान आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून प्रियांका जंगम हिच्या डोक्यावर परिणाम झाला होता. तिच्यावर उरुळी कांचन येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ती घरच्यांना काहीही न सांगता चालत निघून जात असे. नातेवाईक तिला परत घरी घेऊन येत. आज, पहाटे पावणे सहा वाजता तिने वडिलांना झोपेतून उठवले. मी आश्रमामध्ये फिरायला जाते, असे तिने वडिलांना सांगितले. आज, तु फिरायला जाऊ नकोस, उद्या सकाळी आपण दोघे फिरायला जाऊ, असे वडिलांनी तिला सांगितले. त्या नंतर फ्रेश होऊन गोविंद जंगम तिला पहायला आश्रमात गेले. त्यावेळी ती तेथे दिसली नाही. त्याचवेळी त्यांना एका फोन वरुन प्रियांका राहत्या इमारती वरुन पडल्याची माहिती मिळाली. ते तातडीने तेथे गेले असता प्रियांकाच्या डोक्याला मार लागलेला त्यांना दिसला. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. कुणीतरी डॉक्टरांना बोलावून आणले. तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.