मंचर, (प्रतिनिधी) – मंचर, ता. आंबेगाव येथील मंचर उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्याचे शिबिर संपन्न झाले. तालुकास्तरीय शालेय विविध दिव्यांग प्रकाराचे ७९ दिव्यांग विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले होते.
पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभाग व समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय औपचारिक कार्यात्मक वैद्यकीय निदान व उपचार शिबिर उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सविता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले होते.
शिबिरात मतिमंद १७ दृष्टीदोष १४ कर्णदोष १० अस्थिव्यंग २४ बहु विकलांग ७ वाचादोष ५ बुटकेपणा २ अशी तालुक्यातील ७९ दिव्यांग विद्यार्थ्यांचे वैद्यकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय मंचर तज्ज्ञ डॉ. दिघे आणि त्याच्या सहकार्यांनी केले. तालुकास्तरीय शिबिरास शिक्षण विस्तार अधिकारी गजानन पुरी, केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे,विषयसाधनव्यक्ती ज्योत्सना माशेरे उपस्थित होते.
समावेशित शिक्षण विभागाचे विशेषसाधनव्यक्ती राजेश मंदावार,छाया केदारी,विशेष शिक्षक प्रतिभा पडवळ,प्रगती गांजाळे कार्यक्रमाचे नियोजन पाहिले. दिव्यांग विद्यार्थ्यांना, पालकांना भोजन व्यवस्था केली. येण्या-जाण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवास भत्ता देण्यात आला.