पुणे – पुणे-सोलापूर रस्त्यावरील होर्डिंगवर चढून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार मांजरी स्टड फार्मजवळील पेट्रोल पंपानजीक घडला. यामुळे रस्त्यावरील वाहतूकही मोठया प्रमाणात खोळंबली होती. संबंधीत व्यक्तीस पोलिसांनी कशी बशी समजूत घालून खाली उतरवले. संबंधीत 31 वर्षीय तरुणावर हडपसर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार नियंत्रण कक्षातून कॉल आल्यावर हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुकारी पेट्रोल पंपाजवळील सत्तर फूट उंच होर्डिंगवर एक तरुण चढून आत्महत्या करत असल्याची धमकी देत होता. त्याला व्यवसायात वाय फाय केबल नेटवर्कच्या व्यवसायात नूकसान झाले असल्याचे तो सांगत होता. त्याला पोलिसांनी खाली येण्याची विनंती केली असता, तो “मै निचे नही आऊंगो जब तक मुझे न्याय नही मिलता, मै यही रहुंगा, नही तो मेरी जान दे दुंगा असे म्हणत होता. पोलिसांनी कशी बशी समजूत घालून त्याला खाली येण्यास भाग पाडले.