सवन्नाह – अमेरिकेतल्या जॉर्जिया आणि ओक्लहामा या दोन प्रांतांनी आपल्या हद्दीतील लॉकडाऊन शिथिल केला आहे. या दोन्ही प्रांतांच्या सहकार्याने आरोग्य तज्ज्ञांनी तसे न करण्याची सूचना केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष करीत त्या सरकारांनी लोकांच्या मागणीवरून हे निर्बंध शिथिल केले आहेत. अमेरिकेच्या अनेक प्रांतात लॉकडाऊनच्या निर्बंधांच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. खुद्द अध्यक्ष ट्रम्प यांनी पण हे निर्बंध हटवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 50 हजारांच्यावर गेली आहे. अद्यापही लाखो करोनाग्रस्त रुग्णालयात उपचार घेत असून या रोगाला आळा बसल्याची कोणतीही लक्षणे अजून तेथे दिसून आलेली नसताना हे लॉकडाऊन शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जॉर्जिया प्रांतातील मृतांचा आकडा सर्वात अधिक वेगाने वाढत असतानाही तेथील हे निर्बंध मागे घेण्याविषयी काळजी व्यक्त केली जाऊ लागली आहे, पण त्या प्रांताच्या सरकारी सूत्रांनी सांगितले की, आम्ही सरसकट लॉकडाऊन उठवलेले नाही. व्यक्तिगत स्तरावरील काही व्यवसाय सुरू करण्यासच आम्ही केवळ अनुमती दिली असून तेथेही त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य प्रतिबंधक उपाय योजणे बंधनकारकच ठेवले आहेत.