वाई -येथील न्यायालयाच्या आवारातील गोळीबारप्रकरणी पोलिसांनी शरदराव उर्फ सूर्या रवींद्र पवार (रा. मूळ रा. मेणवली, ता. वाई, सध्या रा. पुणे) आणि विजय लक्ष्मण अंकोशी (रा. काशीकापडी वसाहत, वाई) या दोघांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित राजेश चंद्रकांत नवघणे (वय 28, रा. मेणवली) याच्यासह तिघांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
मेणवली येथील हॉटेलमालक व चालकास दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी आणि दरोडा प्रकरणाच्या सुनावणीसाठी वाई न्यायालयात आणलेले “मोक्का’तील संशयित अनिकेत उर्फ बंटी जाधव (रा. भुईंज), निखिल आणि अभिजित शिवाजी मोरे (दोघे रा. गंगापुरी, वाई) यांच्यावर सोमवारी (दि. 7) दुपारी न्यायालयाच्या व्हरांड्यात राजेश नवघणे याने गोळीबाराचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला अटक करून दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती.
या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपली. या गुन्ह्याच्या तपासात आणखी दोन संशयिताची नावे पुढे आली. त्यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही संशियताना सुरक्षिततेच्या दृष्टीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी या गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकार पक्षाने केली. संशयितांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिघांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली.