आदिवासी दिनानिमित्त राजगुरूनगरात मिरवणूक
राजगुरूनगर – आपण लोकशाही मानणारे आहोत. मणिपूर सारख्या चुकीच्या घटना घडतात त्याचा परिणाम त्या समाजावर आणि देशावर होतो. मणिपूरमध्ये दोन महिलांची धिंड काढली, मात्र तेथील मुख्यमंत्र्यांवर कारवाई झाली नाही. ही खेदाची बाब आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे प्रतिपादन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.
आदिवासी उत्सव समिती खेड तालुका आयोजित जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने राजगुरूनगर येथे मिरवणूक काढण्यात आली हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून मिरवणुकीस सुरुवात झाली.
यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष भगवान पोखरकर, जिल्हा परिषद माजी सदस्य अतुल देशमुख, प्रसिद्ध सर्जन व आदिवासे नेते डॉ. दिलीप बांबळे, डॉ. प्रमिला बांबळे, खेड बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे आदिंसह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमिला बांबळे या होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निर्मला पानसरे, जिल्हा परिषद माजी सदस्य मंगल चांभारे, बाबाजी काळे, बाजार समितीचे उपसभापती विठ्ठल वनघरे, संचालक,विजयसिंह शिंदे, सुधीर भोमाळे, माजी नगरसेवक शिवाजी मांदळे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे, सुरेश शिंदे, प्रताप आडेकर, विश्वनाथ सांगडे, शांताराम मते, संतोष भांगे, रामचंद्र शिंगाडे, भोरगिरीच्या माजी सरपंच अर्चना वनघरे, मीनाक्षी भांगे, कल्पना आढारी यांच्यासह आदिवासी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घोसाळी नृत्याने वेधले लक्ष
मणिपूर येथे झालेल्या घटनेचा आदिवासी बांधवांनी जाहीर निषेध केला. हुतात्मा स्मृती स्थळापासून सुरू झालेल्या मिरवणुकीत पालघर येथील घोसाळी आदिवासी नृत्य पथकातील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधले. या मिरवणुकीचा समारोप चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात झाला यावेळी प्रसिद्ध व्याख्याते संपत गारगोटे, एम. के. आढारी यांचे व्याख्यान झाले.