पुणे – शिवसेनेचे पदाधिकारी दीपक विजय मारटकर (36) यांच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे. या आरोपींना अहमदनगर येथील काष्टी येथून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणातील अटक गुन्हेगारांची संख्या नऊ झाली आहे.
संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते(23,रा.लोहीयानगर) व लखन मनोहर ढावरे(30,रा.सहकार चौक, कुंभारघाट) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दिपक मारटकर यांचा खून महेंद्र सराफ व अश्विनी कांबळे यांच्या सांगण्यावरुन करण्यात आला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात 8-9 जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हयाचा समांतर तपास सुरु असताना गुन्हे शाखा युनिट एकची दोन पथके आरोपींच्या मागावर होती. त्यांनी दौंण्ड, काष्टी आणी सोलापूर भागात आरोपींचा शोध घेतला. दरम्यान त्यांना काष्टी येथे आरोपी असल्याची खबर मिळाली. त्यानूसार दोघांना राजवाडी परिसरात संशयास्पदरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, संजय बरकडे, बाबा चव्हाण, अशोक माने, इम्रान शेख, इरफान मोमीन, सुधीर माने आणि प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने केली.