इस्लामाबाद – पाकिस्तानमधील भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये माजी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यावर ठपका ठेवला आहे. आठवड्यापूर्वी मनी लॉन्डरिंगच्या एका मोठ्या प्रकरणात झरदारी यांचे नाव आरोपी म्हणून घेण्यात आले होते. त्यानंतर आता भ्रष्टाचाराच्या आणखी दोन प्रकरणांत त्यांच्यावर ठपका ठेवला.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आणि देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती असलेले झरदारी आज इस्लामाबादेतील न्यायालयात उपस्थित होते. त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून निर्दोष असल्याचा दावा केला आहे.
आजच्या सुनावणीदरम्यान उत्तरदायित्व न्यायालयाने पार्क लेन प्रकरणातील अन्य 19 आरोपींना आणि थत्ता पाणी पुरवणा प्रकरणातील अन्य 15 जणांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत.
न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी झरदारी, त्यांच्या भगिनी फर्याल तालपर यांना मोठ्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात आरोपी केले आहे. पार्क लेन प्रकरणात झरदारी आणि त्यांचे पुत्र बिलावल अली झरदारी यांच्यावर इस्लामाबादमधील 307 एकरची मोक्याच्या जागेवरील मालमत्ता दलालांच्या माध्यमातून अत्यंत क्षुल्लक किमतीला विकत घेतल्याच्या आरोप आहे.
मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात झरदारी आणि अन्य आरोपींनी बनावट खात्यांचा वापर गैरमार्गाने मिळवलेला निधी साठवण्यासाठी केला असल्याचा आरोप आहे. या तिन्ही प्रकरणांमध्ये निर्दोषमुक्त करण्याची झरदारी यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
गेल्या वर्षी राष्ट्रीय उत्तरदायित्व विभागाने त्यांना अटक केली होती आणि अनेक महिने तपास केल्यावर डिसेंबरमध्ये वैद्यकीय कारणावरून त्यांची सुटका केली होती. पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या वतीने आपल्या बदनामीची मोहीमच चालवली जात असल्याचा आरोप झरदारी यांनी केला आहे. आपल्याला पूर्वीही अशाप्रकारच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचेही ते म्हणाले.