आठवड्यात दोन अपघात : नागरिक संतप्त
आळंदी – आळंदीत अनेक रस्ते सुसाट झाले असून केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच एकाच आठवड्यात दोन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला असल्याने आणखी किती हाकनाक बळींची प्रशासन वाट पाहत आहे, असा सवाल नागरिकांनी उपस्थितीत केला आहे. दरम्यान, आळंदीकर नागरिकांनी गतिरोधक बसवण्याची बाब वेळोवळी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली मात्र तरीदेखील प्रशासन अजूनही झोपलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते.
आळंदी हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी आहे. तसेच आळंदी परिसरात अनेक खासगी कंपन्या आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते. कंपन्यांमुळे शहरात जड वाहनांची सातत्याने वाहतूक सुरू असते. अशावेळी वाहनांचा वेग कमी करण्यासाठी वर्दळीचे ठिकाणी मुख्य चौकांमध्ये गतीरोधक असणे अत्यंत आवश्यक असते;मात्र आळंदीतील काही मुख्य चौकांमध्ये एकही गतिरोधक नाही. त्यामुळे येथे वाहने सुसाट असतात. याचा मोठा फटका बसला आहे.
वडगाव-आळंदी रस्त्यावरून सोमवारी (दि. 25) एका डंपरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. याआधी सोमवारी (दि. 18) सायंकाळी पाचच्या सुमारास वडगाव चौक येथे अमित विठ्ठलराव देशमुख (वय 19) या वारकरी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एकाच आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याने आळंदीकर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
मुख्य प्रदक्षिणा मार्ग, आळंदी-वडगाव, आळंदी-मरकळ, चाळीस फुटी, इंद्रायणी पार्क, चऱ्होली, आवारी हॉस्पिटल 30 फुटी तसेच अंतर्गत रस्ते आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना निवेदन देण्यात आले; मात्र त्यावर अद्यापही कारवाई झालेली नाही. परिणामी एकाच आठवड्यात दोन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. प्रशासनाने आतातरी जागे होऊन तात्काळ गतिरोधक वसवावेत.
– सागर भोसले, माजी नगरसेवक
दुचाकीला डंपरची धडक; चिमुकलीचा मृत्यू
आळंदी -शाळेतून घरी जात असताना दुचाकीला डंपरची धडक बसून भीषण अपघात झाला आहे. यात चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना आळंदी-वडगाव रोडवर चाळीस फुटी रस्त्याजवळील गोशाळेजवळ सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात डंपर चालकावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. तनिषा विशाल थोरवे (वय 4, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) असे अपघातात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. तर संतोष जामिरूद्दीन माल असे अटक करण्यात आलेल्या डंपर चालकाचे नाव आहे. तर किसन थोरवे यांनी फिर्याद दिली आहे. किसन थोरवे हे त्यांची नात तनिषाला शाळेतून घरी घेऊन जात असताना आळंदी-वडगाव रस्त्यावर डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात चिमुकलीचा मृत्यू झाला असून किसन थोरवे जखमी झाले आहेत.