वीसगाव खोरे – भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील ग्रामीण भागात गणेशउत्सवाची चाहुल लागली असून, यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा होणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. उत्रौली (ता. भोर) गावात गणेश मूर्तिकार हजारोंच्या संख्येने गणेशमूर्ती आणि गौराई घडविण्याचे काम करीत असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान, महागाईमुळे यंदा गणेशमूर्ती 20 टक्क्यांनी महागणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
उत्रौली व पंचक्रोशीत तयार होणाऱ्या गौराई व गणेशमूर्तींना शेगाव, लातूर, बुलढाणा, मुंबई, ठाणे, लालबाग, धुळे, गुजरात वापी, सूरत, बडोदा, दिल्ली, मद्राससह परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या दोन वर्षांत या व्यवसायाला करोनाचा फटका बसला आहे. गणेश मूर्तीची बनवताना शाडूची, लाल आणि मुलतानी मातीचा वापरावर करावा लागतो.
सध्या वाढलेली मजुरी, कच्च्या मालाच्या किमतीत 10 टक्के, रंगांची 25 टक्के वाढ, इमिटेशन ज्वेलरीत 20 टक्के वाढ यामुळे गणेशमूर्तीची किंमतही 20 टक्क्यांनी वाढणार आहे. उत्रौली गावात सुमारे 15 हजार गणपती व गौराई 40 हजार, व लक्ष्मीचे पाऊल, मूषक, बाळ, हरतालिका, भातुकलीच्या खेळातील जाती, भांडी, तुळशीवृंदावन, कृष्ण बनविले जातात.
गणेश मूर्तींवर आता शेवटचा हात फिरवला जात असून रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगली मागणी आहे. शाडुमाती आणि जिप्सम पावडर राजस्थान, गुजरातवरून मागवली जाते. इकोफ्रेण्डली रंग पुण्याहून, तर कापड सुरतवरून मागविले जाते.
– सुनीता कुंभार, अध्यक्षा, भोर तालुका महिला कुंभार समाज
जयश्री गणेश कला मंदिरात (गौरी गणपती कारखाना) बारामाही
29 महिला कारागीर मूर्ती घडवण्याचे काम करतात, ही परंपरा 57 वर्षांची आहे. यंदा नागरिकांमध्ये गणरायाच्या स्वागतासाठी उत्साह आहे. उत्सवात कोणतेही निर्बंध नसल्याने गणेश मंडळे, भाविक आतापासून येथे गणेश मूर्तीच्या बुकिंगसाठी येत आहेत.
– सीताराम कुंभार, ज्येष्ठ मूर्तिकार, उत्रौली (ता. भोर)