पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी 200 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या 86,296 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत शहरामध्ये 2117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 182 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 18 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 8 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 6 व शहराबाहेरील 2 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरात 1614 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 278 रुग्णांचाही समावेश आहे.
गुरूवारी दिवसभरात शहरात 8 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील निगडी, कासारवाडी, चिंचवड, काळेवाडी, दिघी, बोपखेल येथील 6 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये कासारवाडी येथील एका 24 वर्षीय तरुणाचाही मृत्यू झाला आहे. तर शहराबाहेरील आंबेगाव व आळंदी येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.
दिवसभरात 193 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 82,510 इतकी झाली आहे. दिवसभरात 2217 संशयित रुग्णांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 771 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.