इस्लामाबाद -पाकिस्तान सरकारकडून माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मायदेशी आणण्याची धडपड सुरू आहे. त्यातून त्या सरकारने शरीफ यांना लंडनहून परत पाठवण्याची विनंती ब्रिटनला तिसऱ्यांदा केली आहे.
शरीफ यांना 2018 यावर्षी भ्रष्टाचाराशी संबंधित दोन प्रकरणांत पाकिस्तानी न्यायालयांनी 10 आणि 7 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. तुरूंगात रवानगी झालेल्या शरीफ यांना आजारपणामुळे जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी ते मागील वर्षीच्या नोव्हेंबरपासून लंडनमध्ये मुक्काम ठोकून आहेत. आता तुरूंगवासाची शिक्षा भोगण्यासाठी शरीफ यांना परत आणण्याच्या हालचाली पाकिस्तान सरकारने सुरू केल्या आहेत. त्यातून शरीफ यांच्या प्रत्यार्पणाची विनंती करणारे पत्र अलिकडेच इस्लामाबादेत कार्यरत असणाऱ्या ब्रिटीश उच्चायुक्तांकडे सोपवण्यात आले. शरीफ यांचा व्हिसा रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्या पत्रातून करण्यात आली आहे. एखाद्या परदेशी व्यक्तीला 4 वर्षांपेक्षा अधिक तुरूंगवास झाला असल्यास स्वदेशी पाठवण्याची तरतूद ब्रिटनमधील कायद्यात आहे. त्याकडे पाकिस्तानने लक्ष वेधले आहे. पाकिस्तानी न्यायालयाने याआधीच शरीफ परतले नाहीत तर त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे संकेत दिले आहेत.