राहुरी -तालुक्यातील ब्राम्हणी येथे जमिनीच्या वादावरून चार जणांनी नवरा-बायकोला लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत मंजूर शेख हे गंभीर जखमी झाले. याबाबत राहुरी पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
सायंकाळी नगिना मंजूर शेख या ब्राम्हणी गावात बानकर वस्तीच्या मस्जिद जवळ पाणी आणण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी मुसा मेहमुद पठाण, माणिक कासम शेख, रज्जाक शेख व सलिम चंद शेख (सर्व रा. ब्राम्हणी) हे आले. आणि नगिना शेख यांना म्हणाले की, तूला जमीन पाहिजे का? असे म्हणून शिवीगाळ करू लागले. त्यावेळी नगिना शेख यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी शेख यांचे पती मंजूर शेख हे त्या ठिकाणी गेले असता आरोपी म्हणाले की, तू आमच्याकडे जमीन मागतो काय? तूला जमीन पाहिजे आहे काय? तेव्हा मंजूर शेख म्हणाले की, मला माझी जमीन पाहिजे आहे. याचा राग येऊन चार आरोपींनी मंजूर शेख व नगिना शेख यांना लाथाबुक्क्यांनी व लाकडाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, असे मंजूर शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमध्ये मंजूर शेख यांच्या डोक्याला जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले.