पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दुकानावर आयकर विभागाची रेड पडणार असल्याचे सांगून व्यवस्थापकाने एका सहायक पोलीस आयुक्ताच्या मुलाच्या दुकानातून ५ किलो सोने, ५० किलो चांदी आणि रोकड असा २ कोटी २८ लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर परिसरात घडली आहे.
याप्रकरणी व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद रमेश कुलकर्णी (35, रा. लोणीकाळभोर) असे गुन्हा दाखल आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याप्रकरणी ज्योतिरादित्य ऊर्फ यश राजेंद्र मोकाशी ( 22, रा. निलगीरी लेन, बाणेर रोड, औंध) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १२ मार्च २०२२ ते ८ फेब्रुवारी २०२४ दरम्यानच्या घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी यांनी दोन वर्षांपूर्वी माळवाडी रोड हडपसर येथील शिवनेरी बिल्डिंगमध्ये वसुंधरा ज्वेलर्स नावाने दागिने विक्रीचे दुकान सुरू केले होते. या दुकानाचे व्यवस्थापक म्हणून विनोद कुलकर्णीची नेमणूक करण्यात आली होती.
त्यावेळी वसुंधरा ज्वेलर्समध्ये ५ किलो सोने आणि ८५ किलो चांदी, अशी भांडवली गुंतवणूक फिर्यादींनी नातेवाईक आणि मित्रांकडून घेऊन केली होती. हे सगळे सोने, चांदी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांना देऊन फिर्यादी ज्योतिरादित्य मोकाशी हे एम. एस. चे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे निघून गेले होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फिर्यादी डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यात आले. त्यानंतर फिर्यादी मोकाशी यांनी वसुंधरा ज्वेलर्सचे कामकाज पाहायला सुरुवात केली. दुकानासंदर्भात व्यवस्थापक विनोद कुलकर्णी व इतर स्टाफकडून माहिती घेत असताना फिर्यादी मोकाशी यांच्या लक्षात आले की, दुकान सुरू करताना ५ किलो सोने आणि ८५ किलो चांदी घेतली होती.
त्यापैकी पावणेतीन किलो सोने व ५० किलो चांदी कमी आहे. त्यानंतर फिर्यादी मोकाशी यांनी ही बाब त्यांच्या वडिलांना सांगितली. फिर्यादी यांच्या वडिलांनी सोने, चांदी कमी असल्याबाबत व्यवस्थापक विनोद कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने ७ फेब्रुवारीला सर्व सोने आणि पूर्ण हिशोब देतो, असे सांगितले.
दरम्यान ८ फेब्रुवारी रोजी विनोद कुलकर्णीने याने सकाळी १० वाजता वसुधंरा ज्वेलर्समधील एका कामगाराला फोन करून सांगितले की, दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे व मालकाला हिशोब द्यायचा आहे. त्यासाठी सोने, चांदी तयार ठेव. यानंतर साडेदहा वाजता एक गाडी आली.
कामगारांनी दुकानातील सोने, चांदी गाडीचालकाला देऊन टाकली आणि विनोद कुलकर्णीने सांगितल्याप्रमाणे दुकान बंद केले. ही बाब मोकाशी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दुकानातील व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याच्याकडे सोपवण्यात आलेले ५ किलो सोने व ५० किलो चांदी आणि रोख रक्कम अशी २ कोटी २७ लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे करत आहेत.