पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कामकाजात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचा आसूड उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारताच दोन अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे, तर दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचा भल्याभल्या पोलीस अधिकाऱ्यांनी धसका घेतला असून, पोलीस ठाण्यापेक्षा साइड ब्रँचच बरी होती, असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर साइड ब्रँचवरुन पोलीस ठाण्यासाठी सेटिंग लावणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपापल्या तलवारी म्यान केल्या आहेत. गड्या आपली साइड ब्रँचच बरी, असे म्हणत ते सध्या बघ्याच्या भूमिकेत आहेत.
दरम्यान, मारहाण करणाऱ्यांना पोलिस अटक करीत नसल्याच्या कारणावरून वाघोली पोलीस चौकीत तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची गंभीर दखल घेऊन या चौकीतील सहायक फौजदारासह तिघा पोलिसांना बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. सहायक फौजदार अशोक घेगडे, हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी हा आदेश काढला आहे. मागील दोन दिवसांत सहायक पोलीस निरीक्षकांसह सहा जणांना निलंबित करण्याची वेळ शहर पोलीस दलावर आली आहे.
पोलीस चौकीत महिलेशी गैरवर्तन करून तिला मारहाण केल्याप्रकरणी मगरपट्टा सिटी पोलिस चौकीतील सहायक पोलिस निरीक्षकासह तिघांना मंगळवारी रात्री निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर लगेचच बुधवारी लोणीकंद पोलीस ठाण्यातील तिघांना निलंबित करण्यात आले. या दोन्ही पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही तडकाफडकी बदली करण्यात आली.
…असे आहे प्रकरण
रोहिदास जाधव (34, रा. वाघोली) हा आपण दिलेल्या तक्रारीतील आरोपींवर काय कारवाई केली, हे विचारण्यासाठी वाघोली पोलीस चौकीत १३ फेब्रुवारी रोजी आला होता. त्या वेळी सहायक फौजदार घेगडे, हवालदार उगले व शिंदे यांनी त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले, तसेच त्याला अपमानास्पद वागणूक दिली़. त्यामुळे त्याने पोलीस चौकीच्या आवारात पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो ९५ टक्के भाजला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तक्रारीबाबत वेळीच योग्य दखल न घेता कर्तव्यात निष्काळजीपणा केला, तसेच पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने तिघांना निलंबित करण्यात आले आहे.
पॉइंटरससूनमधून आरोपी पलायन प्रकरण – दोन कर्मचारी निलंबित
हडपसरअंतर्गत मगरपट्टा चौकीत महिलेला मारहार – एक उपनिरीक्षक आणि दोन महिला कर्मचारी निलंबित
वाघोली चौकीसमोर आत्महत्येचा प्रयत्न – एक सहायक फौजदार आणि दोन कर्मचारी निलंबित
हडपसर आणि लोणकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली