पिंपरी, दि. 4 – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ट्विटर वरील अकाउंट पुन्हा एकदा सक्रिय केले आहे. त्याद्वारे नागरिकांशी संवाद साधून शहरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या जात आहेत. त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जात असून नागरिकही पोलिसांशी बोलते होत आहेत..
फेब्रुवारी 2021 मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोशल मीडियावरील आपले अकाऊंट सुरू केले. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्युब आदी अकाउंटचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यासोबत तडीपार गुन्हेगारांवर पाळत ठेवण्यासाठी एक्स ट्रॅकर, पोलीस सेवा लोकाभिमुख करण्यासाठी सेवा उपक्रम आदींची देखील सुरुवात करण्यात आली. काही महिन्यातच पिंपरी-चिंचवड पोलीस सोशल मीडियावर सायलेंट मोडवर गेले. युट्युबवर मुहूर्ताचा केवळ एक व्हिडीओ अपलोड आहे. त्यानंतर एकही व्हिडीओ अपलोड झालेला नाही. फेसबुक पेज दहा महिन्यांपासून पोस्टच्या प्रतीक्षेत आहे. तर इंस्टाग्राम अकाउंटवर आठ महिन्यांपासून शुकशुकाट आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालय हद्दीत आयटी नगरी असल्याने हिंजवडी, तळवडे तसेच शहरातील अन्य भागातील नागरिक ट्विटरवर सक्रिय असल्याने ट्विटर हॅण्डल पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला. त्यानुसार ट्विटर हॅण्डल पुन्हा सक्रिय करत पोलिसांनी त्यावर नागरिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी केलेले उत्कृष्ठ तपास, आवाहन आदींबाबत पोस्ट केल्या जात आहेत. पोलिसांच्या पोस्टवर नागरिक प्रतिसाद देतात, प्रश्न, समस्या उपस्थित करतात. त्यांच्या समस्या नोंदवून घेत पोलीस संबंधितांकडे त्या पाठवत आहेत. आपल्या तक्रारी ऐकून घेतल्या जात असल्याचे समाधान या माध्यमातून नागरिकांना मिळत आहे. ट्विटर प्रमाणेच अन्य सोशल मीडिया अकाउंट देखील सक्रिय करण्याची मागणी शहरवासियांकडून केली जात आहे.