श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – स्वस्तात डिझेलचे आमिष दाखवून दाम्पत्याला मारहाण करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोकड लुटल्याचा प्रकार तालुक्यातील वांगदरी शिवारात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. काही मंडळींनी शिरूर (जि. पुणे) तालुक्यातील एकाशी दोस्ती केली.
दोस्ती घट्ट झाल्यानंतर त्याला डिझेलचे ३५ ड्रम स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले. संबंधित व्यक्तीला गुरुवारी दुपारी वांगदरी शिवारात बोलविण्यात आले. सदर व्यक्ती आपल्या पत्नीला घेऊन दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वांगदरी शिवारातील भिसेवस्ती येथे आला.
त्यावेळी त्याच्याकडे व पत्नीकडे सोन्याचे दागिने आणि पन्नास रुपयांची रोकड होती. दाम्पत्य तिथे पोहोचताच तिथे दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना बेदम मारहाण करीत त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने आणि रोकड काढून घेतली.
या मंडळींनी घडलेला प्रकार तेथील ग्रामस्थांना सांगत त्यांची मदत घेतली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.