मुंबई – नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघातून पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी ठाकरे गटात प्रवेश केला. आता खरी लढाई सुरु झालेली आहे, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर दिली.
विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने सर्वप्रथम शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला होता.
त्यानंतर त्यांची महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. मात्र त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. पराभवानंतर शुभांगी पाटील यांनी आज मातोश्री बंगला येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे गटात अधिकृत प्रवेश केला. ठाकरे गटात प्रवेश केल्यावर शुभांगी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आज पक्षप्रमुख श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील शुभांगी पाटील यांनी सहकाऱ्यांसोबत शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. pic.twitter.com/pr2QUQqFKR
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) February 4, 2023
त्या म्हणाल्या, मी आधीच जाहिर केले की ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. त्यानुसार आज मी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. माझा पराभव झाला असला तरी आता खरी लढाई सुरु झाली आहे. मी एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार आहे. जुनी पेन्शन योजना, बेरोजगारी व अन्य प्रश्नांकडे या आंदोलनातून सरकारचे लक्ष वेधणार आहे. यापुढे शिवसेनेसाठी काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.