शिरूर : तालुक्यातील कोरेगाव भीमा नजीक वाडागाव येथील घटना
शिक्रापूर (प्रतिनिधी) : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) जवळील वाडागाव येथे खेळत खेळत विहिरीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलाचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात दुसऱ्या दिवशी यश आले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाडागाव (ता. शिरूर) येथे राहत असलेल्या प्रेम कनकुटे यांच्याकडे राहत असलेला त्यांचा लहान भाऊ यश हा मंगळवारी दुपारच्या सुमारास शेजारील मुलांसोबत खेळण्यासाठी गेला होता. त्यांनतर काही वेळाने खेळणारी मुले मासे पकडण्यासाठी जवळील दरेकर यांच्या विहिरीकडे गेली. त्यावेळी मासे पकडत असताना अचानकपणे यश हा घसरून विहिरीमध्ये पडला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या एका मुलाने त्याचा वाचविण्याचा प्रयत्न केला असता तो देखील पाण्यात पडला. तेव्हा त्यांच्या एका साथीदाराने बादली विहिरीमध्ये फेकून बुडणाऱ्या दुसऱ्या मुलाला पाण्याबाहेर काढले मात्र, यश हा पाण्यामध्ये बुडाला. त्यानंतर तेथील मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक गोळा झाले.
याबाबत माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सुरेश डुकले, पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने यशला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत यशला पाण्यातून बाहेर काढण्यात अपयश आले. त्यांनतर बुधवारी सकाळच्या सुमारास पुणे येथील फायरब्रिगेडचे पथक त्या ठिकाणी हजर झाले असता त्यांनी बुधवारी दुसऱ्या दिवशी यशचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेमध्ये बारा वर्षीय यश सुंदर कनकुटे (रा. वाडागाव कोरेगाव भीमा आणि मूळ रा. परळी वैजनाथ ता. बीड जि. बीड) याचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन अहवालानंतर नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
याबाबत प्रेम सुंदर कनकुटे (वय १२ वर्षे,मृताचा भाऊ) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.