नियमानुसारच दर आकारणीचे आदेश; तक्रार आल्यास होणार कारवाई
सातारा (प्रतिनिधी) : रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णवाहिकांच्या दरावर अंकुश आणण्यासाठी परिवहन विभागाने चार वर्षांपूर्वी दर निश्चित केले होते. मात्र अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याने अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी बुधवारी रुग्णवाहिकांचे भाडेपत्रक जाहीर केले असून जादा भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिकेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
भाडेपत्रकानुसार जिल्ह्यातील रुग्णवाहिकांचे भाडे सारखेच आहे. रुग्णवाहिका जिथून निघणार आहे तिथून पहिल्या वीस किलोमिटरचा पल्ला किवा पहिल्या दोन तासाच्या काळात नियमीत भाडे आकारले जाईल व त्यानंतर किलोमीटरनुसार भाडे आकारले जाणार असून दरपत्रक रुग्णवाहिकेच्या आतमध्ये लावणेही चालक आणि मालक यांना बंधनकारक करण्यात आले आहे.प्रस्तावित केलेल्या कमाल भाड्यापेक्षा जादा भाडे आकारता येणार नाही. ते आकारताना जाण्याच्या ठिकाणापासून ते परत येण्याचे अंतर असे किलोमीटरवर भाडे आकारले जाईल, असे नियम करण्यात आले आहेत.
असेल दर पत्रक….
मारुती व्हॅन पहिल्या वीस किमीसाठी अथवा दोन तासांकरीता 350 रुपये त्यानंतर प्रति किलोमिटर 12 रुपये, टाटा सुमो व मेटेडोरसारख्या वाहनांना पहिल्या वीस किमीसाठी अथवा दोन तासांकरीता 450 रुपये त्यानंतर प्रति किलोमीटर 13.50 रुपये, टाटा ४०७ स्वराज माझदा पहिल्या वीस किमीसाठी अथवा दोन तासांसाठी 550 रुपये व त्यानंतर प्रत्येक किलोमिटरला 14 रुपये, वातानुकूलीत रुग्णवाहिकेला पहिल्या वीस किलोमिटर अथवा दोन तासांसाठी 700 रुपये व त्यानंतर प्रत्येक किलोमिटरला वीस रुपये दर आकारणी करण्यात आली आहे.
भाडेदर निश्चिती २०१४ मध्येच करण्यात आली आहे. मात्र, याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका चालकांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारत आर्थिक लूट केली जात आहे. याबाबत परिवहन विभागाकडे आलेल्या तक्रारी व मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दि. 9 जूलै रोजीच्या निकालानुसार भाडेपत्रकाबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.