रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे कोकणात होणारा ‘कासव महोत्सव’ यंदा रद्द झाला आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी पर्यटकांना समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांना पाहण्याची संधी हुकली आहे. यावर वन विभागाच्या ‘मॅंग्रोव्ह फाऊंडेशन’ने तोडगा काढला आहे.
समुद्रात जाणाऱ्या कासवांच्या पिल्लांना घरबसल्या ऑनलाइन पाहण्याची संधी त्यांनी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी फाऊंडेशनच्या फेसबुक पेजवर दररोज सकाळी आणि संध्याकाळी वेळासच्या किनाऱ्यावरून लाइव्ह प्रक्षेपण सुरू करण्यात आले आहे.
यंदाच्या कासव विणीच्या हंगाम १९ घरट्यात २१३० कासवाची अंडी, तर एक घरटे नैसर्गिक पध्दतीने संरक्षित करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या हंगामात अधिक पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता होती. घरटी संरक्षित करण्याचा काळ व विणीचा हंगाम याचे गणित मांडून आयोजक व वन विभागाने नियोजन केले होते.
दरम्यान, कोरोनाच्या साथीमुळे यंदा पर्यटक वेळास येथे येऊ शकत नसल्यानं त्यावर फाऊंडेशनने तोडगा काढत कासव प्रेमी नागरिकांना फेसबुक लाइव्ह सुरू केले आहे. त्यामुळे कासवाच्या पिलांचा जन्म ते समुद्रापर्यंतचा प्रवास घरबसल्या अनुभवता येत आहे. दरम्यान, आयोजकांच्या अंदाजाच्या चार दिवस आधीच कासवांची पिल्ले समुद्राकडे जाण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.