कोलोंबो – श्रीलंकेतील नेगोंबो आणि कालुतारा या दोन समुद्रकिनाऱ्यादरम्यान गेल्या 3 दिवसात किमान 20 सागरी कासवे मृतावस्थेत आढळली आहेत. कोपुनगोडा, पामुनुगामा, मुथुराजावेला मार्श आणि इंदुरुवा या किनाऱ्यांवरही अनेक मृत कासवे आढळून आली आहेत.
ही कासवे लाटांबरोबर किनाऱ्यावर येऊन पडली असावीत. या कासवांच्या इतक्या मोठ्या संख्येने मृतावस्थेमध्ये सापडण्याचे कारण आता वनविबागाकडून शोधले जाऊ लागले आहे.
समुद्राच्या पाण्याखाली घडवण्यात आलेल्या एखाद्या स्फोटामुळे ही कासवे मरण पावली असावीत, असा अंदाज वर्तवला जातो आहे. या कासवांच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी मृत कासवांचे शवविच्छेदन करण्याचे आदेश कोलोंबो फोर्ट मॅजिस्ट्रेटनी वन विभागाला दिले आहेत.
मृतावस्थेमध्ये सापडलेली सर्व कासवे एकाच प्रजातीची आणि एकाच आकाराची होती, असे “द नॅशनल ऍक्वॅटिक रिसोर्सेस रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट एजन्सी’ने म्हटले आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये काही विषारी पदार्थ मिसळला गेल्यामुळे या जलचरांचा मृत्यू झाल्याची शक्यता तपासण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याचे नमुने देखील तपासले जाणार आहेत.