वॉशिंग्टन- फिनलंड आणि स्वीडन या देशांना “नाटो’चे सदस्यत्व देण्याबाबत तुर्कीला असलेला आक्षेप लवकरच दूर केला जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या “नाटो’ देशांच्या परिषदेपूर्वीच हा आक्षेप दूर केला जाईल, असेही ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले फिनलंडचे परराष्ट्र मंत्री पेक्का हविस्ता यांच्याबरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ब्लिंकेन यांनी हा विश्वास व्यक्त केला. तुर्कीला ज्या विषयांबद्दल काळजी वाटते आहे, ते दूर केले जाऊ शकत नाही, असे अमेरिकाला अजिबात वाटत नाही, असे ब्लिंकेन म्हणाले.
तुर्कीने स्वीडन आणि फिनलंडला पाठिंबा देण्यापूर्वी या देशांनी काही ठोस पावले उचलायला पाहिजेत, असे तुर्कीचे परराष्ट्र मंत्री मेवलुत कोवुसोग्लु यांनी म्हटले होते. त्याला ब्लिंकेन यांनी उत्तर दिले आहे.
फिनलंड आणि स्वीडन हे नाटोमध्ये सामील होण्यास अमेरिकेने पूर्ण पाठिंबा दिला आहे. थोड्याच अवधीमध्ये हे दोन्ही देश “नाटो’चे सदस्य झालेले असतील, असेही ब्लिंकेन म्हणाले.
फिनलंड आणि स्वीडन दोन्ही देशांचे तुर्कीबरोबर चांगले संबंध आहेत. यापुढच्या काळातही ते कायम राहतील, असा विश्वास फिनलंडचे परराष्ट्र मंत्री हविस्ता यांनी तुर्कीला दिला आहे. ज्या गोष्टींची तुर्कीला चिंता वाटते आहे, त्या मुद्यांचे निराकरण चर्चेद्वारे केले जाईल. ही चर्चा सुरू आहे असेही त्यांनी सांगितले.