इस्तंबुल – तुर्कीयेमध्ये पोलिसांनी कोकेनचा प्रचंड साठा पकडला आहे. हा साठा देशाच्या इतिहासात आतापर्यंत पकडल्या गेलेल्या अमली पदार्थांच्या साठ्यातील तिसरा मोठा साठा आहे. तब्बल ६०८ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे, असे देशाचे गृहमंत्री अली यार्लिकावा यांनी सांगितले. (Turkey becomes ‘entry point’ for drugs reaching Europe, 608 kg of cocaine seized)
युरोपमध्ये पोचणाऱ्या अमली पदार्थांसाठी तुर्कीये हा एक एन्ट्री पॉईंट बनत चालला आहे, असा इशारा देशातील सायबर गुन्हेगारीवर लक्ष ठेवणाऱ्या गटांनी दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
जप्त करण्यात आलेले बहुतेक कोकेन द्रवरुप स्वरुपात आहे. एकाच वेळी ३ प्रांतांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान हे कोकेन पकडण्यात आले. या कोकेनबरोबर या ड्रगवर प्रक्रीया करण्यासाठी वापरण्यात येणारे ८३० किलो रसायन देखील पकडण्यात आले आहे, असे यार्लिकावा यांनी सांगितले.
लेबेनान आणि व्हेनेझुएलाचे नागरिक असलेल्या गुन्हेगारांकडून चालवल्या जाणार् या रॅकेटवर पोलीस कारवाई करत आहेत. या प्रकरणी ९ ट्रक जप्त केले गेले असून ४ विदेशी व्यक्तींना अटक केली गेली आहे, असेही त्यांनी सांगितले. दक्षिण अमेरिकेतून युरोपात पाठवले जाणारे ड्रग तुर्कीयेमध्ये उतरवले जाते आणि तेथून युरोपात वितरीत केले जात असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.