मेक्सिको सिटी – मेक्सिकोत बांधकाम सुरू असेल्या एका ठिकाणी पुरातन काळातील एका अख्ख्या शहराचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष पुरातन काळातील मयान शहराचे असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. या पुरातन अवशेषांमध्ये राजवाडे आणि इमारतींच्या बांधकामांचे अवशेषदेखील आहेत. मेक्सिकोतील युकातन भागामध्ये सुरू असेल्या खोदकामामध्ये मयान शहराचे हे अवशेष सापडल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
मयान या पुरातन काळातील शहराची लोकसंख्या अंदाजे 4 हजार इतकी असावी. इसवी सन 400 ते 900 च्या दरम्यान हे शहर अस्तित्वात होते असा अंदाज आहे. युकातन शहराजवळच्या एका औद्योगिक प्रकल्पासाठी या जागेची 2018 मध्ये निवड करण्यात आली होती.
त्याचवेळी या ठिकाणी काही पुरातन अवशेष असल्याचे लक्षात आले, त्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एन्थ्रोपोलॉजी अँड हिस्ट्री मधील पुरातत्वशास्त्रज्ञांनी नंतर ही जागा ताब्यात घेतली. खासगी जागेत असली तरी या जागेवरील पुरातत्व वारस्याचे जतन करण्यात आले आहे. म्हणूनच मयान शहराचे हे पुरातन अवशेष अधिक महत्वाचे आहेत, असे युकातन शहरासाठीच्या पुरातत्व विभागाच्या संशोधकांच्या पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मयान शहराच्या या अवशेषांमध्ये अनेक छोटे पिरॅमिड आणि वाडे आढळून आले आहेत. युकातन प्रांताच्या दक्षिणेकडील भागात अशाप्रकारची वास्तुरचना अजूनही बघायला मिळत असते. या ठिकाणी विविध सामाजिक वर्गातील लोक होते. या महान राजवाड्यांमध्ये पुजारी, शास्त्री, आणि लहान इमारतींमध्ये राहणारे सामान्य लोक देखील होते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.