कोथरूड – पौड रस्ता येथील श्री तुळजाभवानी माता मंदिरात हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. आकर्षक मूर्ती, दागिन्यांनी सजविलेला साज आणि सिंहासन पाहिल्यावर प्रति तुळजापुरच्या आईचे दर्शन होत असल्याची भावना भाविकांची आहे.
कोथरूड परिसरात 50 वर्षांपूर्वी जयभवानीनगर याठिकाणी सुतार कुटुंबियांच्या शेतात देवीची मूर्ती मिळाली, त्यानंतर मूर्तीची स्थापना त्याच शेतात करून तेथे मंदिर बांधण्यात आले. कालांतराने कोथरूडचा विकास झाला, त्यावेळी हे मंदीर रस्त्यामध्ये येत असल्याने ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा निर्णय झाला. जवळच असलेल्या भवानी माळावर 2001 मध्ये मंदिर बांधून जिर्णोद्धार करण्यात आला.
नवरात्रीमध्ये घटस्थापनेला देवीची काठी निघते. पालखीत देवीची मूर्ती ठेवून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून संपूर्ण गावात मिरवणूक निघते आणि देवीची स्थापना होते. त्यानंतर पुढील नऊ दिवस मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतात. अष्टमीला याग, नवमीला जागरण गोंधळ, दशमीला सीमोल्लंघन कार्यक्रम होतो. सोनं लुटून देवीच्या चरणावर वाहून भक्तीमय आणि प्रसन्न वातावरणात नवरात्रीसण साजरा केला जातो. या नऊ दिवसांत लाखो भाविक दर्शनासाठी बाहेरगावाहूनही येतात, असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
- सुतार कुटुंबीयांच्या शेतात आढळली मूर्ती
- 2001 मध्ये मंदिराचा जिर्णोद्धार
- कोथरूड परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान