कराड – येथील शहर व परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने नागठाणे येथून ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईत त्यांच्याकडून दोन लाख 40 हजार रूपये किमतीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी जय अशोक साळुंखे, आशिष बन्सीराम साळुंखे (दोघेही रा. नागठाणे, जि. सातारा) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकल चोरीबाबत विशेष लक्ष देऊन तात्काळ गुन्हे उघड करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
त्याअनुषंगाने कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राजू डांगे यांनी दोन संशयितांना नागठाणे येथून ताब्यात घेतले. त्यातील एक जण सातारा जिल्ह्यातून तडीपार, तर दुसरा सराईत दुचाकी चोर आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी जय साळुंखे व आशिष साळुंखे या दोघांनी कराड शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून दोन लाख 40 हजार रूपये किमतीच्या सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशी काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.