तुळजापूर,दि.६- तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेत प्रचंड तफावत आढळून आली असून सोन्यात तर ५० टक्के तूट आढळली आहे. विशेष म्हणजे मातेला वाहण्यासाठी आणलेल्या ४ तोळ्याचा सोन्याचा पादुका चक्क तांब्याच्या असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. हा धक्कादायक प्रकार मंदिर संस्थानने आणलेल्या सोने व चांदी शुध्दता तपासणी मशीनमुळे उघडकीस आला आहे.
यामुळे भविष्यात देवीस बनावट साेने-चांदी दान कराल तर भाविकासह संबंधित सोने विकणाऱ्या सराफांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा मंदिर संस्थानने दिला आहे. तुळजाभवानी मातेला सोमवारी भाविकांनी ४ तोळ्याच्या सोन्याचा पादुका अर्पण केल्या.
मात्र मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांला सोन्याचा पादुंकाविषयी शंका आल्याने मंदिर संस्थानने नव्यानेच मागवलेल्या सोने चांदी शुध्दता तपासणी मशीनमध्ये तपासणी करण्यात आली असता चक्क ताब्यांच्या पादुका असल्याचे आढळून आले.
तसेच वाहिलेल्या सोने- चांदीत यापूर्वीही प्रचंड तफावत आढळून आली आहे. विशेषत: सोन्यामध्ये तब्बल ५०% तुट आढळून आली. राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने कान टोचल्यानंतर अखेर तुळजाभवानी मंदिर संस्थानने तब्बल २८ लाख ५० हजार रूपये खर्चुन सोने चांदी शुध्दता तपासणी मशीन मागवले आहे.
मंदिरातील ५ कर्मचाऱ्यांना १० दिवसाचे मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापूर्वी मंदिर संस्थान भाविकांनी वाहिलेल्या सोन्या चांदीची सोने सदृश, चांदी सदृश्य अशा नोंदी घेत होते, मात्र यापुढील काळात वाहिक सोन्या चांदीच्या अचूक नोंदी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शुध्दता तपासणी मशीनमुळे वाहिक सोन्या चांदीची अचूकता समजणार असून भाविकांच्या श्रध्देवर घाला टाकण्याचा सोनारांचा गोरख धंदा चव्हाटय़ावर येणार आहे.
भाविकांची फसवणुक टळणार
देवीला अर्पण करण्यासाठीच्या सोने-चांदीमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. भाविकांच्या श्रद्धेवर घाला घालण्याचा हा प्रकार पूर्वी पासून राजरोसपणे सुरू होता. मात्र मंदिर संस्थानच्या सोने-चांदी शुद्धता तपासणी मशीनमुळे सोने – चांदी विक्रेत्यांकडून होणाऱ्या भाविकांच्या फसवणुकीला आळा बसण्यास मदत होणार आहे.