Donald Trump – अमेरिकेची संसद असलेल्या कॅपिटल हिलवर ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या हल्ल्यासाठी मदत पुरवल्याचा आरोप माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अध्यक्षीय निवडणुकांमध्ये पराभूत झाल्यावर या निवडणुकीचे निकाल उधळून लावण्याच्या उद्देशाने ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना कॅपिटल हिलमध्ये घुसण्यास मदत केली होती, असे या आरोपामध्ये म्हटले आहे.
कॅपिटल हिल प्रकरणी ट्रम्प यांच्यावर ऑगस्ट महिन्यातच एक आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये ट्रम्प यांनी दंगलखोरांशी संगनमत केल्याचा आरोप होता. मात्र आजच्या आरोपात त्यापुढील आरोप आहे.
ट्रम्प दंगलखोरांना ओळखत होते. त्यातील प्राउड बॉइज हे ट्रम्प यांना देशभक्त मानत होते. ट्रम्प पराभूत झाल्याचा त्यांना राग आला होता. निवडणूकीच्या विजयाचे प्रमाणपत्र वितरीत केले जाऊ नये, यासाठी ट्म्प यांच्या सूचनेनुसार या दंगलखोरांंनी कॅपिटल हिलमध्ये घुसून धुडगूस घातला होता, असे या आरोपामध्ये म्हटले आहे.
प्रत्यक्ष सुनावणीच्यावेळी या आरोपाच्या समर्थनार्थ पुरावे सादर केले जातील. त्यामध्ये २०२० च्या निवडणुकीच्यावेळची ट्रम्प यांची भाषणे, धमक्या आणि साक्षीदारांचे जबाबदेखील सादर केले जातील, असे सरकारी पक्षाने म्हटले आहे. मात्र ट्रम्प यांच्यावरील हे आरोप म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचे ट्रम्प यांच्या वकिलांनी म्हटले आहे.